Press "Enter" to skip to content

राजकारणानंतर आता कृषी क्षेत्रातही गाजणार ‘अकोला पॅटर्न’, सघन कापूस लागवड क्रांती आता देशभर लागू होणार

अकोला : कापूस उत्पादनात भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतो आहे.. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव…. अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा ‘अकोला पॅटर्न’ आकाराला आणत आहेत… 11 जुलैला कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’ने कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केली आहे. आता कपाशीचं भविष्य अकोल्याच्या मातीत लिहिलं जात आहे.

भारत हा कापूस उत्पादनात जगातील सर्वात मोठा देश आहे. देशात जवळपास 130-140 लाख हेक्टर क्षेत्रफळावर दरवर्षी कापूस लागवड केली जाते. मात्र या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताची उत्पादकता अजूनही अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे.

जागतिक उत्पादकतेचा तुलनात्मक आढावा (2024 आकडेवारीनुसार):

USA: सुमारे 950–1000 किलो/हेक्टर

ब्राझील: सुमारे 1800 किलो/हेक्टर

चीन: 1600 किलो/हेक्टर

भारत: केवळ 450–500 किलो/हेक्टर

या पार्श्वभूमीवर, भारतात उत्पादनवाढीच्या नव्या तंत्रज्ञानांची, पद्धतींची गरज प्रकर्षानं जाणवत होती. आणि यातूनच अकोल्यात सुरू झालेला एक प्रयोग, संपूर्ण देशाच्या शेती धोरणात क्रांती घडवतोय.

‘अकोला पॅटर्न’: अकोल्यातून देशभर…

11 जुलै 2025 रोजी तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत भारताचे केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी जाहीर केलं की, “2030 पर्यंत भारतात 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’द्वारे कापूस लागवड केली जाणार आहे.”

सघन पद्धत’ म्हणजे काय? :

अकोल्यातील दिलीप ठाकरे या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक कापूस लागवडीला पर्याय म्हणून सघन कापूस लागवड पद्धती विकसित केली. पारंपरिक पद्धतीत एका एकरात सरासरी 6-7 हजार झाडं लावली जातात. पण सघन पद्धतीत 30-40 हजार झाडं एकाच एकरात लावली जातात.

सघन पद्धत:

20cm x 20cm अंतराने झाडं

एकरी 29 ते 40 हजार झाडं

योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)

एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी

4-5 क्विंटल सरासरी उत्पादन

पावसावर आधारित, अनिश्चितता

सघन पद्धतीतील मुख्य वैशिष्ट्ये:

20 सेमी x 20 सेमी अंतराने रोपांची लागवड

बुटके, उभट वाढणारे, कमी अंतरात बोंडं येणारे वाण

सिंचन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं तंत्रशुद्ध नियोजन

उत्पादन: एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत

2017 मध्ये दिलीप ठाकरे यांनी एकरी 18 क्विंटल कापसाचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं!

दिलीप ठाकरे यांचा प्रयोग आता देशभरात :

दिलीप ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र अशा 9 राज्यांमध्ये ‘अकोला पॅटर्न’नं लागवड केली जाते. त्यांच्या यशामुळे त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर करण्यात आली आहे.

वैज्ञानिक बळकटी : पीडीकेव्हीचा पुढाकार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV) या पद्धतीच्या संशोधनात आणि प्रसारात पुढे आलं आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यात 3,000 हेक्टरवर लागवड झाली असून, पुढील हंगामात हे क्षेत्र 50,000 हेक्टरवर नेण्याचं लक्ष्य आहे.

कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणतात, “शास्त्रशुद्ध शेती, योग्य वाण, तंत्रशुद्ध पद्धती आणि शेतकऱ्याचं समर्पण… यावर आधारित सघन लागवड ही देशातील कापूस शेतीचं भविष्य ठरू शकते.”

जागतिक स्तरावर भारताची उत्पादकता अजूनही मागे

जगातील सुमारे 24 टक्के कापूस क्षेत्रफळ भारतात असलं, तरी उत्पादनाच्या बाबतीत आपण चीन, ब्राझीलसारख्या देशांच्या तुलनेत खूपच मागे आहोत. त्याचं मुख्य कारण म्हणजे:

पारंपरिक लागवडीतील कमी झाडं

पावसावर अवलंबून सिंचन

आधुनिक तंत्रज्ञानाची मर्यादित अंमलबजावणी

‘अकोला पॅटर्न’ ही नवी शेती क्रांती!

‘प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅटर्न’ने राजकारणात चर्चा निर्माण केली, तसाच शेतीतल्या ‘अकोला पॅटर्न’ ने देशभरात कापूस उत्पादनाची नवी क्रांती सुरू केली आहे.हा पॅटर्न केवळ उत्पादनच नाही, तर उत्पन्न आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढवतोय. शेतकऱ्याच्या डोळ्यांत नव्या आशेची किरणं दिसतायत… आणि त्या आशेचं नाव आहे – ‘अकोला पॅटर्न’!

Source link